मुंबई : मुंबईतील मराठी माणसाला मुंबईतच घर मिळत असल्याने जनाब संजय राऊतांची पोटदुखी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना आदित्य ठाकरे हे स्वतः वरळीचे आमदार आणि त्यावेळी कॅबिनेट मंत्री असतानाही, तसेच जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण मंत्री असतानाही बीडीडी चाळीमधील घराची किंमत 50 लाख रुपये ठेवली होती. परंतु महायुती सरकार आले तेव्हा अतिशय परवडणाऱ्या दरात, म्हणजेच 25 लाख रुपयांमध्ये बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचे घर देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले. संजय राऊतांना मात्र मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करायचे असल्याने मुंबईत असे प्रकल्प होऊ नयेत, ही भूमिका ते सातत्याने घेत आहेत, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाविकास आघाडीच्या काळात एसआरएचे भूखंड बिल्डरांना दिले होते आणि बिल्डरांवर मेहरबानी दाखवून त्यांचा मोठ्या प्रमाणात कर माफ केला होता. उद्धव ठाकरेंनीही एसआरएचे प्रकल्प होऊ नयेत, अशी भूमिका घेतली होती. मुंबईत मराठी माणसाला हक्काचे घर मिळू नये, यासाठी अशा प्रकल्पांना विरोध करण्याचा प्रयत्न संजय राऊत आणि त्यांच्या लोकांकडून सुरू आहे. परंतु, धारावीमध्येही पुनर्विकास होत आहे आणि तिथेही मराठी माणसाला त्याच ठिकाणी हक्काची घरे दिली जाणार आहेत. त्यामुळे संजय राऊतांनी कितीही नौटंकी केली, कितीही खोटे आरोप केले तरी मुंबईतील मराठी माणसाला मुंबईतच ठेवण्याचे काम देवाभाऊ आणि महायुतीचे सरकार करणार आहे, असे श्री. बन यांनी सुनावले.
संजय राऊत, वर्षा बंगला पाडण्यापेक्षा जनतेत जाऊन काम करा, असे सुनावत श्री. बन म्हणाले की, त्यांना वर्षा बंगला नकोय, मंत्रालय, विधानसभा आणि संसदही नको. देवाभाऊ स्वत:साठी मुंबईत घर बांधत नाहीत. त्यांचे मुंबईत घरही नाही. तुम्हाला मात्र मातोश्री 1, मातोश्री 2 आणि यानंतर मातोश्री 3 ही बांधायचा आहे. पत्रा चाळ बिल्डरच्या घशात घालणाऱ्या संजय राऊत यांनी इतरांबाबत बोलू नये.
मुंबई आणि म्हाडा ही दोन प्राधिकरणे सरकारी आहेत. त्यांच्यात काही मतभेद असतील तर ते दूर करण्यासाठी सरकार सक्षम आहे. सरकार यावर योग्य तो तोडगा काढेल. मात्र या दोन प्राधिकरणांमध्ये संजय राऊत नावाच्या तिसऱ्या प्राधिकरणाने पडण्याची गरज नाही. झोपडपट्टीतील लोकांना वर्षानुवर्षे आहेत तिथेच ठेवायचे आणि सर्वसामान्य जनतेची घरे लुटायची, हा तुमचा धंदा आहे आणि त्यासाठी हा तुमचा आटापिटा सुरु आहे, असे श्री. बन यांनी फटकारले.
श्री. बन पुढे म्हणाले, रोहित पवार यांना नौटंकी करायची सवयच आहे. यापूर्वीही त्यांनी मफलर मॅनचा खुलासा करू, असे जाहीर केले होते. पण पुढे काहीच केले नाही. त्यांच्याकडे या संदर्भात काही पुरावे असतील तर त्यांनी ते तपास यंत्रणांकडे द्यावेत. त्या आधारे नक्की तपास केला जाईल. अलिकडे त्यांनी एमपीएससी पेपरफुटीबाबत आंदोलन केले. पण पुढे काय झाले? विद्यार्थ्यांना त्याचा कितपत फायदा झाला? ज्या जुन्या मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या त्याच कायम ठेवल्या गेल्या. ते ऊसदराच्या आंदोलनात जात नाहीत. कारण आपले साखर कारखाने असल्याने शेतकऱ्यांना तो उसदर द्यावा लागेल हे त्यांना ठाऊक असल्याने ते ऊसदर आंदोलनाकडे फिरकत नाहीत.