खेड :- तालुक्यापासून २३ किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या शिरगाव गावात मारुतीचे जुने मंदिर असून, माता रामवरदायनी मंदिरासमोरील हे जुने कौलारू मंदिर आजही प्रचंड प्रकाशझोतात आहे.

समर्थ रामदासांनी सन १६४३-४४ साली छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्यासाठी एकूण ११ मंदिरे बांधली. यात मुख्य उद्देश तरुणांसाठी रोजच्या व्यायामाचा होता. परंतु नंतरच्या काळात अनेक मारुतीची, म्हणजे हनुमानाची, मंदिरे महाराष्ट्रात व देशात बांधण्यात आली. मात्र शिरगावचे हनुमान मंदिर सर्वात विरळच आहे! या मारुती मूर्तीची सुरुवात कधी झाली याची नोंद नाही; पण या पवित्र मूर्तीत वेगळेपण नक्कीच आहे. मूर्तीच्या पायाखाली एक राक्षसीण, तर शेपटीच्या टोकाला दुसरी राक्षसीण आहे!

संपूर्ण मूर्ती दगडाची असून ४ × ४ च्या दगडी शिळेत बनवलेली आहे. सह्याद्री पर्वतरांगेच्या पलीकडे सातारा जिल्हा लागतो. अंदाजे लोकसंख्या ३००० (तीन हजार) असून हे गाव भोसल्यांचे सातगाव म्हणून परिचित आहे. याचे कारण म्हणजे साताऱ्यातून पहिला वंशज श्री. हरजी भोसले येथे आला आणि तो आंबेबन वाडीत राहिला. आजही तेथे जुने, मोडकळीस आलेले घर असून त्याचा “जोता” तेथे आहे. ते घर भव्य असून, तेथील जोत्याला अजूनही मोठमोठ्या लोखंडी कड्या आहेत. आंबेबनापासून तीन वाड्या सोडून हे प्रचंड पौराणिक मारुतीचे मंदिर आहे. शिरगाव हे १३ वाड्यांचे गाव आहे. गावच्या तीन पुढाऱ्यांनी व मानकऱ्यांनी या वर्षी प्रथमच “हनुमान जयंती उत्सव” साजरा करण्याचे ठरविले आहे, जे अभिमानास्पद आहे.