चिपळूण : मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या विश्वास, विकास आणि जनकल्याणाच्या यशस्वी वाटचालीनिमित्त तसेच जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने भारतीय जनता पार्टीतर्फे चिपळूण तालुका ग्रामीण मंडलात विविध ठिकाणी भव्य वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी नबिन यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांतर्गत ‘एक पेड माँ के नाम’ या वृक्षसंवर्धन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमांतर्गत मेरी माता विद्यालय, खेर्डी, श्री सुकाई देवी मंदिर खडपोली, पेढांबे, कळकवणे, उपजिल्हा रुग्णालय दादर तसेच नंदिवसे विभागातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी भाजपा ग्रामीण मंडल अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य विनोद भुरण, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अभिनव भुरण, तालुका सरचिटणीस दिपक शिंदे, उपाध्यक्ष महेश शिंदे, युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर भुरण, नॅब आयचे अध्यक्ष निलेश भुरण, सुकाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष निलेश कदम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, शिक्षकवृंद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करत अधिकाधिक वृक्ष लागवड व संगोपनाचा संकल्प केला. तसेच प्लास्टिकमुक्त परिसर, जलसंवर्धन आणि स्वच्छता याबाबतही जनजागृती करण्यात आली.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत पर्यावरण रक्षणासाठी अशा उपक्रमांची आजच्या काळात नितांत आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचा संदेश देत हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
मोदी सरकारच्या १२ वर्षपूर्ती निमित्त भाजपचा ‘एक पेड माँ के नाम’ वृक्षारोपण उपक्रम उत्साहात…
