रायगड : दुर्गराज रायगडावर आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त इतिहासाची पुनरावृत्ती अनुभवायला मिळाली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा उत्सव हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा करण्यात आला. छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याने रायगड पुन्हा एकदा शिवमय झाला. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण गड दुमदुमून गेला.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि दुर्गराज रायगड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारपासून शाहिरी कार्यक्रम, सांस्कृतिक सादरीकरणे आणि पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर सुवर्णमुद्रांचा अभिषेक करून सोहळ्याची सांगता करण्यात आली. हा अभिषेक युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराज शहाजीराजे यांच्या हस्ते पार पडला.

या सोहळ्याला आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि हजारो शिवभक्त उपस्थित होते.

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून स्वराज्याचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश देण्यात आला. या भव्य सोहळ्यामुळे दुर्गराज रायगडावर पुन्हा एकदा शिवकालीन वैभव अनुभवायला मिळाले.