रायगड : जगाच्या इतिहासात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या महाड क्रांतिभूमीतील सामाजिक समतेच्या चवदार तळे पाणी सत्याग्रह लढ्याला ऐतिहासिक महत्व आहे. याच धर्तीवर दि.१९/२० मार्च २०२६ रो कोकणातील महाड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक महाड चवदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहन कार्यक्रमाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होणार आहे.

भारतीय समाज परिवर्तनाच्या चळवळीत, महाड चवदार तळे सत्याग्रहाचे खूप मोठे महत्व आहे.याच सत्याग्रह आंदोलनातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय नेतृत्व उदयास आले व दलितांच्या आत्मसन्मानाच्या लढाईचा प्रारंभ झाला.
या १९२७ सालच्या ऐतिहासिक सत्याग्रह परिषदेचे प्रमुख संघटक,महाड जवळील दासगाव चे शिक्षित लढाऊ तरुण रामचंद्र बाबाजी मोरे उर्फ आर बी मोरे हे होते. जे त्याकाळातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत विश्वासू सहकारी व पत्रकारही होते.नंतर ते कम्युनिस्ट पक्षाचे धडाडीचे नेते व पत्रकार बनले.
अशा या आर.बी मोरे यांच्याच महाड जवळील लाडवली या जन्म गावातील,बेटकर मठातील सभागृहात दि.१९ मार्च रोजी ” मानवी हक्क राष्ट्रीय परिषद,” मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राज्या तर्फे व जाती अंत संघर्ष समिती , महाराष्ट्र समितीच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणार आहे. या परिषतेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कॉ.एम.ए.बेबी, पॉलिट ब्युरो सदस्य डॉ अशोक ढवळे, आंबेडकरी विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे,लोक शाहीर संभाजी भगत, मा.क.प चे राज्य सचिव व शेतकरी नेते कॉम्रेड अजित नवले, महाराष्ट्रातील सामाजिक विचारवंत आदी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सुमारे एक हजार प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.