मुंबई : MPSC आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. येत्या काही दिवसांत MPSC विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांसंदर्भात चांगली बातमी येईल, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी संयम राखावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यात MPSC आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्या वेळी विद्यार्थ्यांचे म्हणणे आणि त्यांच्या रास्त अपेक्षांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते.
स्वतःचा जिल्हा, तालुका आणि घर सोडून नोकरीसाठी धडपडणाऱ्या तरुण-तरुणींना पाहून मनाला वेदना होतात, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत आज मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली असून, तेही या विषयावर सकारात्मक असल्याचे जाणवल्याचे राज ठाकरे यांनी नमूद केले.
येत्या काही दिवसांत MPSC विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय किंवा महत्त्वाची बातमी समोर येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संयम राखावा, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले आहे.
