मुंबई:- टोलेजंग इमारतींच्या वाढत्या गर्दीतही चाळ संस्कृतीतील आपुलकी, एकोपा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य चारकोप सेक्टर १ येथील रायझिंग सन क्रिडा उत्सव मंडळ गेल्या २८ वर्षांपासून सातत्याने करीत आहे. मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त आयोजित ‘दीपोत्सव २०२६’ विविध सांस्कृतिक, मनोरंजक आणि क्रीडा उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला.

१० नोव्हेंबर रोजी भैरव स्माईल इन्फ्रा प्रोजेक्टचे श्री. निखिल सुर्वे आणि श्री. किशोर दळवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित रांगोळी स्पर्धेत सामाजिक आणि पारंपरिक विषयांवर आकर्षक रांगोळ्या साकारण्यात आल्या.

१३ नोव्हेंबर रोजी महिला व पुरुष क्रिकेट स्पर्धा तसेच पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा प्रथमच पुरुषांनीही पाककला स्पर्धेत सहभाग घेतला. सौ. सुचिता चौलकर यांच्या खास मासळीच्या पदार्थांनी उपस्थितांची मने जिंकली.

१४ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सत्यनारायण महापूजा, रासगरबा आणि बालदिनानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या उत्सवाचा आनंद घेतला.

दिपोत्सवाचे विशेष आकर्षण ठरलेल्या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमात तब्बल १५० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. श्री. प्रशांत प्रिंदावणकर आणि श्री. सुधाकर वस्त यांनी विविध मनोरंजक खेळांच्या माध्यमातून कार्यक्रमात रंगत आणली. मनसे नेते श्री. भूषण अनंत विचारे यांच्या संकल्पनेतून आणि पाठबळातून साकारलेल्या या कार्यक्रमाचे महिलांनी विशेष कौतुक केले. परिसरातील १४ संस्थांमधील महिलांना या कार्यक्रमाची दरवर्षी आतुरतेने प्रतीक्षा असते.

संपूर्ण आठवडाभर करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला. विविध कार्यक्रमांना जग्गू यांच्या बहारदार डी.जे. सादरीकरणाने विशेष रंगत आणली. त्यांच्या जोशपूर्ण संगीतामुळे उत्सवातील जल्लोष द्विगुणित झाला.

मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश सोरप यांनी सर्व देणगीदार, रहिवासी आणि सहभागी स्पर्धकांचे आभार मानून विजेत्यांचे अभिनंदन केले. अध्यक्ष श्री. राजेश सोरप, चिटणीस श्री. अमित पालांडे, खजिनदार श्री. सुनीत कदम यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले. मंडळाचे सल्लागार श्री. सुधाकर कदम, श्री. कमलाकर सक्रे आणि श्री. राजेश सोनावणे यांचे मार्गदर्शन लाभले.

टोलेजंग इमारतींच्या युगातही चाळ संस्कृतीतील माणुसकी, आपुलकी आणि सामाजिक एकतेचा वारसा जपणारा हा दीपोत्सव म्हणजे केवळ मनोरंजनाचा उत्सव नसून संपूर्ण परिसराला एकत्र आणणारा आनंदसोहळा ठरला.