लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मौजे अंजणारी परिसरात वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याऐवजी संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या परिसरातील अपघातांची मालिका थांबवून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी येत्या २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अंजणारी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा लांजा तालुकाप्रमुख युवराज हांदे यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली कित्येक वर्षे रखडलेले असून कामातील दिरंगाई, नियोजनाचा अभाव आणि कामाच्या दर्जाबाबत निर्माण झालेल्या शंका यामुळे वाहनचालक व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः अंजणारी परिसरात दिवसाआड अपघात घडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या अपघातांमध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून प्रवाशांना आर्थिक फटका बसण्याबरोबरच जीवितहानीचाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरातील अपघातात पोलीस कर्मचाऱ्यांनाही आपला जीव गमवावा लागल्याची बाब अधिक चिंताजनक असल्याचे शिवसेनेने निदर्शनास आणून दिले आहे.

अपघातांचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांनी तातडीने ठोस पावले उचलणे अपेक्षित असताना केवळ तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना करून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा आभास निर्माण केला जात असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. महामार्गावरील धोकादायक ठिकाणांची पाहणी करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना, योग्य दिशादर्शक फलक, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि अपघातप्रवण ठिकाणी तातडीने सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या कथित गलथान कारभाराचा जाब विचारण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनाला जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस यांची उपस्थिती लाभणार आहे. आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी लांजा शहरप्रमुख मोहन तोडकरी, माजी उपसभापती सुभाष रामाने, उपविभागप्रमुख शांताराम गुरव, अल्लादिन नेवरेकर, बाबा धावणे, भालचंद्र लाड, अक्षय कुरुप, मंगेश लांजेकर, बाळकृष्ण गुजर, शाखाप्रमुख बेर्डे सर, शिवाजी भालेकर, श्री. पांचाळ यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

महामार्ग विकासाच्या नावाखाली प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू राहणार असेल, तर प्रशासनाला जाब विचारणे अपरिहार्य आहे. अंजणारीतील अपघातांचा प्रश्न केवळ वाहतुकीचा नसून तो थेट नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षिततेशी निगडित आहे. त्यामुळे आता आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कृतीची गरज असल्याची भूमिका ठाकरे शिवसेनेने घेतली आहे.