चिपळूण : चिपळूण शहरातील ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण विरेश्वर आणि रामतीर्थ या दोन्ही तलावांच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी लवकरच निधी मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार शेखर गोविंदराव निकम यांना दिले. “निकम साहेब, विरेश्वर आणि रामतीर्थ हे दोन्ही तलाव मंजूर करून पाहायला येतो,” असे आश्वासन मंत्री मुंडे यांनी दिल्याने चिपळूणच्या तलाव संवर्धनाच्या विषयाला नवी गती मिळण्याची शक्यता आहे.
चिपळूण शहरातील विरेश्वर तलावाच्या संवर्धनासाठी राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत सुमारे १ कोटी ५१ लाख ६५ हजार ६६४ रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. संबंधित समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यताही मिळाली आहे. मात्र, अंतिम प्रशासकीय मान्यता व निधी मंजुरीचा शासन निर्णय अद्याप प्रलंबित आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन विरेश्वर तसेच रामतीर्थ तलावांच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी शासनाकडे सादर असलेल्या प्रस्तावाची माहिती देत दोन्ही तलावांच्या विकासासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली.
विरेश्वर आणि रामतीर्थ तलावांच्या विकासासाठी स्वर्गीय अजितदादांची शिफारस तसेच मुख्यमंत्री महोदयांचीही शिफारस असल्याचे स्वतः मंत्री मुंडे यांनी सांगत या दोन्ही तलावांच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच मंजुरी व निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
चिपळूण शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीशी जोडलेल्या या दोन्ही तलावांचे संवर्धन झाल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच नागरिकांसाठी आकर्षक सार्वजनिक ठिकाणे विकसित होण्यास मदत होणार आहे. तलाव परिसराचे सुशोभीकरण आणि पर्यावरणपूरक विकास झाल्यास चिपळूणच्या पर्यटन क्षमतेलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
‘निकम साहेब, विरेश्वर-रामतीर्थ दोन्ही तलाव मंजूर करून पाहायला येते!’…मंत्री पंकजा मुंडे यांचे आमदार शेखर निकम यांना आश्वासन…
