अमरावती : अमरावती च्या नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ ने पर्दाफाश केला आहे. तब्बल ४९८ ग्रॅम सोने आणि दोन लाख रुपये रोख चोरीला गेल्याच्या या प्रकरणात अकोला येथील विधीसंघर्षग्रस्त बालकाला नागपुरी गेट पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने अथक प्रयत्नांनंतर ताब्यात घेतले.
अल्पवयीन मुलाने समोरील दरवाजा न तोडता मागील सर्व्हिस गल्लीतून थेट स्पायडरमॅनसारखा चढून घरफोडी केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. अकोला शहरातही त्याने तब्बल ९ घरफोड्या केल्या असून, त्यानंतर तो अमरावतीत आला होता.
चोरी केलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन त्याने हैदराबाद गाठले. तेथे खोली भाड्याने घेऊन तो राहत होता. मात्र, सायबर पोलिसांच्या मदतीने त्याचे लोकेशन मिळवत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह तब्बल ७२ लाख २७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सुमारे २०० सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि विविध जिल्ह्यांमध्ये केलेल्या तपासाच्या आधारे पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले.
