मुंबई : भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी संगनमत करून निवडणूक आयोगाच्या मदतीने व्होटचोरी केली आहे. या व्होटचोरीतूनच मोदी सरकार सत्तेत आले आहे, ही व्होटचोरी उघड झाली असून मोदी-शाह व भाजपाला मदत करणारे भ्रष्ट निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमारची हकालपट्टी करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्षाने देशभर आंदोलन पुकारले असून आज राज्यातही ‘लोकशाहीचा काळा दिवस’ आंदोलन करण्यात आले. बुलढाणा येथील आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सहभाग घेतला, यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, भाजपा सरकार हे चोरीचे सरकार असून त्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी मदत केली आहे, म्हणूनच चोरी उघड होताच भाजपाचे नेते ज्ञानेशकुमार यांचा बचाव करत त्यांना संरक्षण देत आहेत. व्होटचोरी, एसआयआरच्या मुद्द्यावर इंडिया आघाडीचे ३०० खासदार तीन दिवसापासून निवडणूक आयुक्तांना भेटण्यास जात आहेत पण त्यांना भेटू दिले जात नाही. मोदी-शाह यांचे सरकार ज्ञानेशकुमार यांची पाठराखण करत आहे. तर अमित शाह यांचे पोलीस विरोधी पक्षनेते राहुल गांधी, यांच्यासह खासदारांना धक्काबुक्की करत आहे, मारहाण करत, त्यांना अटक करत आहे. लोकशाही व संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवून हुकूमशाही पद्धतीचा कारभार सुरु आहे. ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव चा नारा देत इंडिया आघाडीचे आंदोलन सुरु आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी व लोकशाहीच्या रक्षणासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने आज आंदोलन केले आहे, असे सपकाळ म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, काँग्रेस सरकारनेच निवडणूक आयोगासह अनेक स्वायत्त संस्थांची उभारणी केली आहे, हे फडणवीस यांना माहित नाही का? या संस्थांवर आता भाजपाने कब्जा केला असून त्यांच्या माध्यमातून लोकशाही व संविधान संपवण्याचे काम फडणवीस यांचा पक्ष करत आहे. काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करत असताना भाजपाच्या फडणवीस यांनी बचाव करण्याची गरज काय. भाजपाची चोरी पडकली गेली असल्याने देवेंद्र फडणवीस यांची चिडचीड होत असून, ते या संस्थांची वकिली करत आहेत, असेही सपकाळ यांनी म्हटले आहे.
राज्यातील नांदेड, बुलढाणा, नाशिक, अमरावती, नागपूर, बुलढाणा, चिपळूणसह अनेक जिल्ह्यात ‘लोकशाहीचा काळा दिवस’ आंदोलन करुन भाजपा सरकार व निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात तीव्र घोषणा देण्यात आल्या. ज्ञानेशकुमार यांची हकालपट्टी झाली नाहीतर हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
