मुंबई – नसरापूर प्रकरणात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली असून न्यायालयाच्या या निर्णयामुळे पिडीतेला व तिच्या कुटुंबियांना खरोखरच न्याय मिळाला आहे शिवाय या निर्णयामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करतानाच न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी मनापासून स्वागत केले आहे.

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुरडीवर अत्याचार करुन अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. अवघ्या दोन महिन्यात घटनेची सुनावणी घेऊन निर्णय दिलेला हा पहिलाच खटला ठरला आहे असेही सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या.

अशा क्रूर विकृताला समाजात कोणतेही स्थान नाही. या निकालामुळे कायद्याचा धाक निर्माण झाला असून असे कृत्य पुन्हा करण्यास नराधम धजावणार नाहीत असे सांगतानाच निष्पाप मुलींना व महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी तपास यंत्रणा व सरकार नेहमीच पाठीशी उभे आहे असा विश्वास सुनेत्रा अजित पवार यांनी दिला.