चिपळूण : तालुक्यातील पिंपळी खुर्द येथील अंकिता रविंद्र गोरीवले वय 25 या युवतीचा मृतदेह काल शुक्रवार दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी सव्वानऊच्या सुमारास गोवळकोट-शिंदेवाडी येथील वाशिष्ठी नदीपात्रात आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. अंकिता 25 ऑगस्टपासून घरातून बेपत्ता होती. तिचा नातेवाईक व स्थानिकांकडून सर्वत्र शोध सुरू होता. मात्र, तीन दिवसांनंतर तिचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी गोवळकोट-शिंदेवाडी येथील गणपती विसर्जन घाटाजवळ वाशिष्ठी नदीच्या पात्रात महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना स्थानिक नागरिक वसंत शिंदे यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, पोलीस उपनिरीक्षक विकास निकम, पोलीस उपनिरीक्षक मीरा महामुनी, पोलीस कॉन्स्टेबल विनोद आंबेरे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढून ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर अंकिता गोरीवले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या घटनेची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेने पिंपळीसह संपूर्ण चिपळूण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.