चिपळूण :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिपळूण तालुका पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार, दि. ११ जुलै रोजी पाग कन्याशाळेच्या सभागृहात पार पडली. बैठकीत शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्याबरोबरच नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे सोडविण्यासाठी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयातून नियमित सेवा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
बैठकीत शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या SIR कार्यक्रमासंदर्भात सविस्तर चर्चा करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती, नागरिकांच्या अडचणी आणि त्यावर आवश्यक उपाययोजनांबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २२ जुलै रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त तालुकाभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार सोमवार, दि. १३ जुलैपासून तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण आणि वृक्षवाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
बैठकीत नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये कामकाज करताना नागरिकांना अडचणी आल्यास त्यांनी चिपळूण येथील आमदार शेखर निकम यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच आठवड्यातून पाच दिवस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेतील आणि त्या संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून सोडविण्यासाठी प्रयत्न करतील, असे ठरविण्यात आले.
यानुसार आठवड्यातील चार दिवस प्रांतिक उपाध्यक्ष शौकतभाई मुकादम, जयेंद्रथ खताते आणि तालुकाध्यक्ष नितीन उर्फ अबुशेठ ठसाले हे जनसंपर्क कार्यालयात उपलब्ध राहणार आहेत. तर प्रत्येक गुरुवारी पंचायत समितीचे सभापती सूर्यकांतभाई खेतले तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या ऐकून घेणार आहेत. या सर्व कामांचा आढावा आमदार शेखर निकम घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
