नाशिक : संघटन सृजन अभियानांतर्गत निवड झालेल्या काँग्रेस पक्षाच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांच्या १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आज नाशिक येथे उद्घाटन करण्यात आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव तथा महाराष्ट्राच्या सहप्रभारी रेहाना चिश्ती, खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, प्रशिक्षण विभागाचे महाराष्ट्राचे प्रमुख आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, राजाराम पानगव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन व ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
काँग्रेसचे संघटन अधिक सक्षम, प्रभावी आणि जनतेशी थेट जोडणारे करण्याच्या उद्देशाने या निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दहा दिवस चालणाऱ्या या शिबिरात नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना काँग्रेसची विचारधारा, संघटनात्मक बांधणी, नेतृत्व विकास, जनसंपर्क, निवडणूक व्यवस्थापन तसेच आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून तळागाळातील कार्यकर्त्यांशी अधिक प्रभावी संवाद निर्माण करून पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर या प्रशिक्षण शिबिरात विशेष भर देण्यात येणार आहे.
