मुंबई : वर्षभर घरात बसायचे आणि भेटी मिळत नाहीत म्हणून खासदार दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर त्यांच्या मतदारसंघांमध्ये दौरे करायचे याने काहीही साध्य होणार नाही. असे वरातीमागून घोडे काढून तुमची वरात सजणार नाही. संजय राऊत ज्या पद्धतीची शिवीगाळ करतात त्यामुळे जनता तुमच्या पाठीशी नाही. खासदार – आमदारांना गद्दार म्हणण्यापेक्षा हे लोक आपल्याला का सोडून गेले, याचे आत्मपरीक्षण करा.
आता खासदार सोडून गेले. येत्या काळात तुमचे आमदार, नगरसेवकही आणि सामान्य कार्यकर्तेही तुमच्यासोबत राहणार नाहीत. संजय राऊत यांच्या मूर्खपणाच्या बडबडीला कंटाळून जनतेने आपल्याला नाकारलेय, हे उद्धव ठाकरे यांनी लक्षात घ्यावे, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला.
अमितभाई शाह, देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे एका सुरात, एका दिलाने काम करत असल्याचे सांगून श्री. बन म्हणाले, आम्ही राष्ट्रप्रथम याच धोरणातून काम करतो.
आमचा अजेंडा मातोश्री 2 बांधणे नाही. देवेंद्रजींचा अजेंडा महाराष्ट्र पुढे घेऊन जायचा असल्यानेच त्यांना तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळाले. महाराष्ट्राचे हित डोळ्यासमोर ठेवूनच देवाभाऊ दिवसरात्र काम करत असतात. तुमच्यासारखे घरात बसत नाही. तुमच्यासारखी गटबाजी महायुतीत नाही. मिलिंद नार्वेकर विरुद्ध भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना महायुतीत कधीही पहायला मिळत नाही. त्यामुळे संजय राऊतांनी आधी आपल्या घरातील फाटकी धुणी धुत बसावे आणि मग इतरांवर टीका करावी.
