सडवे : ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण संदेशाला प्रत्यक्ष कृतीची जोड देत सडवे येथे ग्रामस्थांनी श्रमदानातून तब्बल ८० मीटर लांबीचा बंधारा बांधण्याचे काम यशस्वीपणे पूर्णत्वास नेले.
पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा जमिनीत अधिकाधिक निचरा व्हावा, भूजलपातळीत वाढ व्हावी तसेच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करता यावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कामासाठी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष जयेंद्र कावणकर, सरपंच वसंत मेंगे, पोलीस पाटील रोशन पादड, ग्राम अध्यक्ष प्रकाश मेंगे, जितेंद्र मनवल, माजी पोलीस पाटील हरिश्चंद्र कावणकर, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक पादड, ग्रामपंचायत सदस्य महेश वाळंज यांच्यासह गावातील सुमारे ५० युवक व ज्येष्ठ ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सर्वांनी एकजुटीने श्रमदान करीत बंधाऱ्याचे काम पूर्ण केले. युवकांचा उत्साह आणि ज्येष्ठ ग्रामस्थांचे मार्गदर्शन यांचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला.
गावाच्या विकासासाठी लोकसहभाग आणि सामूहिक श्रमदान किती महत्त्वाचे आहे, याचा आदर्श सडवे ग्रामस्थांनी या उपक्रमातून घालून दिला आहे. शासनाच्या विविध जलसंधारण योजनांना लोकसहभागाची जोड मिळाल्यास जलसमृद्ध गावाची संकल्पना प्रत्यक्षात उतरू शकते, हे या उपक्रमाने अधोरेखित केले आहे.
सडवे ग्रामस्थांच्या या एकजुटीचे परिसरातून कौतुक होत आहे.