रायगड : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे मराठा समाजाच्या महत्त्वाकांक्षी मराठा भवन प्रकल्पाच्या उर्वरित कामाचे भूमिपूजन आज उत्साहात पार पडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. यावेळी मराठा भवन हे भविष्यात समाजाला दिशा देणारे ‘दीपस्तंभ’ ठरेल, असा विश्वास खासदार तटकरे यांनी व्यक्त केला.

त्रिय मराठा समाज, श्रीवर्धन-म्हसळा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला समाजबांधवांची मोठी उपस्थिती लाभली. मराठा भवन परिसरात पार पडलेल्या या सोहळ्याला अध्यक्ष वसंत यादव, मुंबई मंडळाचे अध्यक्ष किशोर राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना खासदार सुनील तटकरे यांनी मराठा भवन हे केवळ एक बांधकाम नसून, मराठा समाजाच्या अस्मितेचे, एकतेचे आणि संघटित शक्तीचे प्रतीक असल्याचे सांगितले. तसेच, या वास्तूमुळे समाजातील शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना नवी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उर्वरित कामासाठी आवश्यक निधी आणि सर्वतोपरी सहकार्य उपलब्ध करून देण्याची ग्वाही देत, येत्या १ डिसेंबरपूर्वी ही वास्तू पूर्णत्वास नेण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.