मुंबई – दादांची स्फूर्ती आणि राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत ‘फोटोफिनिश’ असे यश मिळाले असल्याचे सांगतानाच सुनिल तटकरे यांनी सुनेत्रावहिनी, जय पवार आणि बारामतीतील सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
आज प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत विशेष मेहनत जय पवार यांनी घेतली. त्यावर ऊस उत्पादक, सभासदांनी अभूतपूर्व विश्वास दाखवला त्याचे समाधान आम्हाला आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.
जी पकड स्वर्गीय दादांनी बारामतीत निर्माण केली होती आणि दादांच्या दुर्दैवी निधनानंतर पोटनिवडणुकीत वहिनींना विक्रमी मतदान देशात मताधिक्याच्या फरकाने केले होते याची आठवणही सुनिल तटकरे यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना करुन दिली.
सोमेश्वर कारखान्याची निवडणूक वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आली होती. वेगवेगळी राजकीय भाकीते करण्यात आली होती. पण स्वर्गीय दादांचे योगदान आणि वहिनींचे कणखर नेतृत्व यामाध्यमातून अभूतपूर्व असे यश मिळाले आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
कुणाला शह मिळाला यापेक्षा दादांच्या प्रती असलेल्या भावना आणि वहिनींचे नेतृत्व याबद्दलचे यश महत्त्वाचे आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.