मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतींना मोठा फटका बसला असून गुरुवारी सोन्याने तब्बल सहा महिन्यांचा नीचांक गाठला.अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर निर्माण झालेला भू-राजकीय तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या बाजारात मोठी घसरण नोंदविण्यात आली.

सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये स्पॉट गोल्डची किंमत घसरून प्रति औंस ४,०६३.८७ डॉलरपर्यंत खाली आली. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानल्या जाणाऱ्या सोन्यावर वाढत्या आर्थिक दबावाचा परिणाम स्पष्टपणे दिसून आला आहे.

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेतील महागाईचा दर अपेक्षेपेक्षा जास्त राहण्याची शक्यता तसेच फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर दीर्घकाळ उच्च पातळीवर कायम ठेवले जाण्याची भीती यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यापासून काही प्रमाणात दूर राहण्यास सुरुवात केली आहे. याचा थेट परिणाम जागतिक बाजारातील सोन्याच्या किमतींवर झाला आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातील या घसरणीचा परिणाम भारतीय सराफा बाजारावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी काही दिवसांत सोन्याच्या दरांमध्ये आणखी चढ-उतार दिसून येऊ शकतात. गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे लक्ष आता जागतिक घडामोडी तसेच अमेरिकेच्या आर्थिक धोरणांकडे लागले आहे.