रत्नागिरी : ग्राहकांचा दृढ विश्वास आणि विनम्र ग्राहकसेवेच्या बळावर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने व्यावसायिक प्रगतीची घोडदौड कायम राखत आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत, म्हणजेच ३० सप्टेंबर २०२६ अखेर बँकेने तब्बल ६ हजार कोटी रुपयांच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे ओलांडला आहे. याच कालावधीत बँकेला ४९ कोटी १३ लाख ३६ हजार रुपयांचा भरघोस नफा झाला असून, गतवर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत नफ्यात १० कोटी ७४ लाखांची घसघशीत वाढ नोंदवली गेली आहे. या नेत्रदीपक कामगिरीमुळे बँकेने सहकार क्षेत्रातील आपल्या यशाची कमान अधिक उंचावली आहे.

राज्यातील अग्रगण्य जिल्हा बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बँकेने पारंपरिक बँकिंगसोबतच आधुनिक तंत्रज्ञान व डिजिटलायझेशनवर विशेष भर दिला आहे. सध्या बँकेमार्फत ग्राहकांना एनईएफटी, आरटीजीएस, एटीएम, मोबाईल बँकिंग आणि क्यूआर कोड यांसारख्या अद्ययावत डिजिटल सुविधा अखंडपणे दिल्या जात आहेत. यापुढे जात जिल्ह्यातील ग्राहकांसाठी बँक येत्या काही दिवसांत आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीम (AEPS) ही अत्याधुनिक सेवा कार्यान्वित करणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, ग्राहकांना ही प्रगत सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या राज्यातील मोजक्या तीन जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये रत्नागिरी जिल्हा बँकेचा समावेश होणार असून, या सेवेमुळे ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहार अधिक सुलभ होणार आहेत.

बँकेने ठेवी, कर्जवाटप आणि नफा या तिन्ही आघाड्यांवर नोंदवलेल्या उल्लेखनीय वाढीबद्दल बँकेचे अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्यासह सर्व संचालक मंडळाने सर्व सन्माननीय सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांचे मनापासून आभार मानले आहेत. ग्राहकांच्या अखंड सहकार्यामुळेच हा टप्पा गाठता आला असून, भविष्यातही बँकेवर असाच दृढ विश्वास कायम ठेवावा, असे आवाहनही बँक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. संचालक मंडळाचे दूरदृष्टीपूर्ण व अचूक निर्णय आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांची कर्तव्यदक्ष मेहनत यामुळेच बँकेला हे यश संपादन करता आले, असे गौरवोद्गार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर गिम्हवणेकर यांनी काढले आहेत. या उल्लेखनीय यशाबद्दल सहकार आणि व्यावसायिक वर्तुळातून रत्नागिरी जिल्हा बँकेचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.