चिपळूण : महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाशिवाय भारताची कल्पनाच पूर्ण होऊ शकत नाही. या तिन्ही महापुरुषांनी आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली असून त्यांच्या अनुयायांनी परस्पर विरोधाचे वातावरण निर्माण करण्याऐवजी त्यांच्या विचारांतील समान धागा समजून घ्यावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व लेखक संजय आवटे यांनी केले.
शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात निर्भय बनो भारत जोडो अभियांनांतर्गत 26 सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने राजन इंदुलकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सामाजिक एकता परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. चिपळूणमधील सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक एकोपा कायम राखण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेला विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेहरूंमुळेच देश समृद्ध
आवटे पुढे म्हणाले, पंडित नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान नसते तर भारताचा विकास एवढ्या व्यापक पातळीवर झाला नसता. भारत हा विविधतेत एकता जपणारा संघराज्यात्मक देश आहे. मात्र सध्या समाजात जातीय ध्रुवीकरणाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा परिस्थितीत सामाजिक ऐक्य टिकविण्यासाठी समाजाने सजग राहणे आवश्यक आहे.
देशातील संत, समाजसुधारक आणि पुरोगामी विचारवंतांनी भारताला एकत्र बांधून ठेवण्याचे कार्य केले असून चिपळूणसारख्या शहरात विविध संघटना एकत्र येऊन सामाजिक सलोख्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी कौतुकाने नमूद केले.
गांधी-नेहरू-आंबेडकरांशिवाय भारत पूर्णच होऊ शकत नाही : ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे..
