मुंबई : मुंबईतील ”एसआरए”च्या प्रकल्पांसाठी वापरण्यात येणाऱ्या विकास नियंत्रण नियमावलीतील 33 (11) तरतुदीवरून जनाब संजय राऊत महापालिकेचा महसूल बुडत असल्याचा आरोप करत आहेत. मात्र, या नियमांतर्गत मुंबईत नेमके किती प्रकल्प राबविण्यात आले याचा अभ्यास केला असता या प्रकल्पांचे सर्वाधिक लाभार्थी राऊत बंधूच असल्याचे आढळते. राऊत बंधूंशी संबंधित सात ते आठ प्रकल्पांची माहिती समोर आली असल्याचा गौप्यस्फोट करीत भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी या प्रकल्पांची यादीच गुरुवारी सादर केली. या प्रकल्पांवर आक्षेप घेण्यापूर्वी संजय राऊत यांनी स्वतःचे आणि आपल्या बंधूंचे प्रकल्पांशी असलेले संबंध स्पष्ट करावेत, असे आव्हानही त्यांनी दिले. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी श्री. बन यांनी यादीतील दहिसरमधील श्रद्धा प्राईड, ज्योतिरादित्य रिअल्टर्स अँड डेव्हलपर्स, मेट्रो बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, वांद्रे पूर्व येथील श्रद्धा मंगलमूर्ती प्रकल्प, मुलुंड पश्चिम येथील श्रद्धा प्राईड आणि भांडुप पश्चिम येथील श्रद्धा शेल्टर अँड स्पेसेस या प्रकल्पांचा संपूर्ण तपशील देत या प्रकल्पांमध्ये यात संजय राऊत यांची भागीदारी किंवा आर्थिक हितसंबंध आहेत का? या माध्यमातून राऊत बंधूंना किती आर्थिक लाभ झाला? असे प्रश्न उपस्थित केले. संजय राऊत यांनी या प्रकल्पांबाबत मुख्यमंत्र्यांना स्वतंत्र पत्र लिहून त्यांच्या परवानग्या, आर्थिक व्यवहार आणि महापालिकेच्या महसुलावर झालेल्या परिणामांची चौकशी करण्याची मागणी करावी, असेही श्री. बन यांनी सुनावले.
मराठवाड्यातील दुष्काळाच्या संकटामुळे लातूरमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना अशा परिस्थितीत काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत टिपू सुलतानविषयक कार्यक्रमात झालेल्या नोटांच्या उधळपट्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याबद्दल श्री. बन यांनी टीका केली. ज्या टिपू सुलतानने हिंदूंची मंदिरे पाडली, हिंदूंच्या आया-बहिणींवर अत्याचार केले, अशा टिपू सुलतानचा वारसा पुढे चालवला पाहिजे, असे अमित देशमुख सांगत आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. तुम्ही हिंदूंचा अपमान का करता? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात टिपू सुलतानचा उदो-उदो तुम्ही का करत आहात, असे सवाल करत श्री. बन यांनी लातूरमध्ये टिपू सुलतानवरील पुस्तके तरुणांना उपलब्ध करून देण्यात यावीत या अमित देशमुख यांच्या आवाहनाचाही समाचार घेतला. याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी खुलासा करावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात टिपू सुलतानचा उदो उदो केल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेची माफी मागायला हवी, अशी मागणी केली.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राबाबत घडलेला प्रकार निश्चितच चुकीचा आहे. त्यांच्या अवमानाचे समर्थन कोणीही करू शकत नाही. या प्रकरणी शायना एनसी यांनी माफी मागितल्यानंतर हा विषय आता संपवला पाहिजे. मात्र, बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार सोडून काँग्रेससोबत जाणे ही त्यांच्या विचारांची प्रतारणा नाही का? बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार संजय राऊत यांना आहे काय, असा सवालही बन यांनी उपस्थित केला. संजय राऊत यांनी आधी काँग्रेससोबत जाण्याबद्दल महाराष्ट्राची माफी मागावी, असा घणाघात श्री. बन यांनी केला.
एसआरए प्रकल्पाचे सर्वाधिक लाभार्थी संजय राऊत बंधू; भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पुराव्यासह केला गौप्यस्फोट
