ठाणे – टीडीआर घोटाळ्यामुळे वनखात्यासह ठाणे महानगर पालिकेची नाचक्की होत असतानाच आता ठाणे महानगर पालिकेचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे. अमेरिकेतील काही राज्य आणि युरोपमधील काही देशांनी हद्दपार केलेला अॅमेझॉनचा मेगा डेटा सेंटर ठाण्यात उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे.
या डेटा सेंटरमुळे नोकऱ्या उपलब्ध होतील, असा दावा केला जात असला तरी केवळ ६० जणांना नोकऱ्या मिळणार असून त्याबदल्यात ६०० ठाणेकरांच्या जीवावर बेतणार आहे. आधीच ३० एम. एल. डी. पाणी कमी येत असल्याची कबुली अर्थसंकल्पात आयुक्तांनी दिलेली असताना ठाण्याच्या वाट्याचे १२ एम. एल. डी. पाणी या डेटा सेंटरला दिले जाणार आहे. तसेच, अमर्याद वीज वापर, ध्वनिप्रदूषण यामुळे ठाणेकर बेजार होणार आहेत. त्यामुळे या सेंटरला आमचा विरोध असणारच आहे. सभागृहात विरोध तर करूच मात्र जनतेमध्येही जाऊन विरोधाची भूमिका घेऊ , असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिला. तर, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी, हा डेटा सेंटर ठाणेकरांच्या मूळावर उठला असून पर्यावरणीय हानीदेखील मोठ्याप्रमाणात होणार आहे. त्यामुळे या डेटा सेंटरविरोधात रस्त्यावर तसेच कायदेशीर बाजूनेही लढा देणार आहोत, असे सांगितले.
अॅमेझॉन कंपनीने कल्पतरूकडून बाळकूम परिसरात १ हजार ८३० कोटी रूपयात १३० कोटींचे मुद्रांक शुल्क भरून ५३ एकर जमीन खरेदी केली आहे. येथे मेगा डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. हे डेटा सेंटर म्हणजे ठाणेकरांच्या मूळावर उठलेला राक्षस असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. या पत्रकार परिषदेस गटनेते अभिजीत पवार आणि महिलाध्यक्ष मनिषा भगत हेदेखील उपस्थित होते.