लांजा: मुंबई-गोवा महामार्गावर वाकेड येथे शनिवारी सकाळी अडीच तासांच्या अंतराने एकाच कारचे सलग दोन अपघात झाले. पहाटे ट्रेलरच्या धडकेने रस्त्याच्या कडेला उभी केलेली ऑरा कार सकाळी पुन्हा एका भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत सापडली. सलग दुसऱ्या धडकेनंतर काही वेळातच ऑरा कारने पेट घेतल्याने ती पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र, सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये जीवितहानी टळली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदरकुमार किशोर साव (वय २३, रा.विरार पूर्व, जि.पालघर) हा आपल्या ताब्यातील हुंडाई कंपनीची ऑरा कार क्रमांक (एमएच.४८.डीक्यू. ३५५७) घेऊन १८ सप्टेंबर रोजी रात्री विक्रोळी येथून कणकवलीकडे भाडे घेऊन निघाला होता. शनिवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास तो वाकेड येथे आला असता त्याच्या कारला मागून येणाऱ्या एका ट्रेलरने धडक दिली. या धडकेमुळे कार रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली.
या अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सिकंदर साव तसेच कारमधील कुटुंबीयांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर अपघातग्रस्त कार महामार्गावर संरक्षक भिंतीजवळ उभी करण्यात आली होती. ती कार गॅरेजमध्ये नेण्यासाठी क्रेनची प्रतीक्षा सुरू होती. अशातच सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या स्कॉर्पिओने (एमएच.४७.बीटी.८००६) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ऑरा कारला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर स्कॉर्पिओ काही अंतरावर जाऊन थांबली. तर स्कॉर्पिओच्या धडकेनंतर काही वेळातच ऑरा कारने अचानक पेट घेतला आणि काही वेळातच कार आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. यावेळी पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी पाण्याच्या सहाय्याने गाडीला लागलेली आग विझवली.
अपघातातील स्कॉर्पिओ चालक नीरज मायाशंकर यादव (वय २५, मुळ रा.ग्रामनगरी, पो.राजेपुर, जि.जौनपूर, राज्य.उत्तरप्रदेश सध्या रा.मालाड पूर्व, मुंबई) हा प्रिती शैलेश निषाद व त्यांचे पती शैलेश निषाद यांना घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने प्रवास करत होता. या घटनेत ऑरा कारचे मोठे नुकसान झाले असून याप्रकरणी लांजा पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू होती.
विशेषतः दोन्ही अपघातावेळी लांजा पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय मारळकर, हेडकॉन्स्टेबल नासिर नावळेकर, विलास जाधव, कॉन्स्टेबल स्वप्निल कदम, उमाजी बजागे, किरण डोर्लेकर यांच्यासह वाकेड येथील ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते नंदू सुर्वे आणि जिजाऊ संस्थेचे योगेश पांचाळ यांनी घटनास्थळी तत्परतेने मदतकार्य केले.