लांजा: तालुक्यातील वेरवली येथे झालेल्या वैशाली विलास हेगिष्टे यांच्या हत्या प्रकरणासह वेरवली येथे यापूर्वी घडलेल्या संशयास्पद मृत्यू आणि दागिने चोरीच्या घटनांची सखोल चौकशी करण्याची मागणी वेरवली येथील ग्रामस्थांनी केली असून यासंदर्भात लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांना शनिवारी सकाळी सामूहिक निवेदन सादर केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील वेरवली लाडवाडी येथे १९ ऑक्टोबर रोजी एका वृध्द महिलेचा खून झाल्याची घटना घडली होती, या घटनेने लांजा तालुक्यात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी संशयतीला ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच संशयिताने कर्जबाजारीपणामुळे चोरीच्या उद्देशाने खून केल्याची कबुली दिली होती. तर अवघ्या १२ तासांत आरोपीला गजाआड करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मागील काही वर्षात वेरवली गावात घडलेल्या संशयास्पद मृत्यूंची आणि दागिने चोरीच्या घटनांची चौकशी करण्यात संदर्भात वेरवलीतील लाडवाडी, रामवाडी व तेलीवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत लांजा पोलीस ठाण्यात निवेदन दिले.

वेरवली येथील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, वेरवली लाडवाडी येथे १९ ऑक्टोबर २०२६ रोजी घडलेल्या हत्येच्या घटनेमुळे वेरवली गावात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या घटनेची त्याचप्रमाणे यापूर्वी घडलेल्या संशयास्पद मृत्यू आणि चोरीच्या घटनांची सखोल चौकशी होणे आवश्यक असून वैशाली हेगिष्टे यांच्या हत्या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपीला कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. तसेच या गुन्ह्यात संशयित आरोपीव्यतिरिक्त अन्य कोणाचा सहभाग आहे का, कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत केली आहे का? याचीही चौकशी करण्याची यावी. त्याचप्रमाणे हेगिष्टे यांच्या हातातील बांगड्या चोरीला गेल्याची घटना तसेच चोरीस गेलेल्या अन्य वस्तूंचा शोध घेऊन त्या जप्त करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही निवेदनात म्हंटले आहे.

याशिवाय, चार वर्षांपूर्वी वेरवली येथील भाई लाड यांच्या सून नम्रता लाड यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्या देखील अंगावरील दागिने चोरीला गेल्याच्या घटना घडली होती. चार वर्षांपूर्वीची नम्रता लाड यांच्या मृत्यूच्या वेळी दागिने चोरीला जाण्याची घटना आणि १९ ऑक्टोबर रोजी झालेल्या वैशाली हेगिष्टे यांच्या हत्या प्रकरणातील दागिने चोरी यांच्यात काही संबंध आहे का, याचीही पडताळणी करण्यात यावी. तसेच वेरवली येथील यापूर्वीच्या संशयास्पद मृत्यू आणि चोरी प्रकरणांचा सुरू असलेला तपास आणि सद्यस्थितीतील हत्या प्रकरण यांचा काही संबंध आहे का, याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी वेरवली येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.

लांजा पोलीस निरीक्षक यांना निवेदन देताना वेरवली येथील लाडवाडी, रामवाडी आणि तेलीवाडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी उपस्थित ग्रामस्थांना निवेदनाची दखल घेत सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, वैशाली हेगिष्टे यांची राहत्या घरी वेरवली लाडवाडी येथे निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली होती. मात्र, या गुन्ह्यातील संशयिताला ताब्यात घेऊन अवघ्या १२ तासांच्या आत पोलिसांनी खाक्या दाखवत गुन्ह्याचा उलगडा केल्याने वेरवली येथील ग्रामस्थांनी लांजा तथा रत्नागिरी पोलिस प्रशासनाचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांना पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करत कौतुक केले.