चिपळूण : चिपळूण शहरातील मालमत्ता कर सर्वेक्षणानंतर अनेक मालमत्ताधारकांना वाढीव घरपट्टीच्या नोटिसा मिळाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही मालमत्तांचे मोजमाप, बांधकामाचा प्रकार, बांधकाम पूर्णत्वाचे वर्ष तसेच करआकारणीचा आधार याबाबत त्रुटी असल्याची नागरिकांची तक्रार असेल, तर अशा प्रत्येक प्रकरणाची योग्य पडताळणी होणे आवश्यक आहे. नागरिकांवर चुकीच्या सर्वेक्षणाचा किंवा प्रशासकीय त्रुटींचा आर्थिक भार पडू नये, हीच आमची ठाम भूमिका आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे चिपळूण नगरपरिषदेचे गटनेते व नगरसेवक मिथिलेश विकी नरळकर यांनी अन्यायकारक किंवा चुकीची घरपट्टी आकारल्याची तक्रार असलेल्या सर्व मालमत्ताधारकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांच्या तक्रारी समजून घेऊन, उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी करून आणि आवश्यक त्या प्रशासकीय पाठपुराव्याद्वारे त्यांच्या समस्यांचे निरसन करण्यासाठी पक्ष प्रयत्नशील राहील.

प्रशासक काळात झालेल्या मालमत्ता सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल, तर त्या सर्वेक्षणाची निविदा, करार, प्रत्यक्ष मोजमाप, कामाची गुणवत्ता, भुगतान आणि त्यानंतरच्या तक्रारी यांची पारदर्शकपणे तपासणी होणे गरजेचे आहे. सर्वेक्षणातील त्रुटींसाठी संबंधित एजन्सी किंवा प्रशासनाची जबाबदारी निश्चित करण्याबरोबरच नागरिकांना योग्य करआकारणीचा न्याय मिळणे अधिक महत्त्वाचे आहे.

“मालमत्ताधारकांनी आपल्या घरपट्टीच्या नोटिसा, जुन्या करपावत्या, मालमत्तेची कागदपत्रे आणि सर्वेक्षणातील त्रुटी दर्शविणारी उपलब्ध माहिती जतन करून ठेवावी. घरपट्टी चुकीची किंवा अन्यायकारक वाटत असल्यास आमच्याशी संपर्क साधावा. प्रत्येक तक्रारीची वस्तुस्थिती समजून घेऊन संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल. नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत,” असे आवाहन गटनेते व नगरसेवक मिथिलेश विकी नरळकर यांनी केले.

तसेच, तक्रार असलेल्या मालमत्तांची प्रत्यक्ष पडताळणी करून संबंधित मालमत्ताधारकांना मोजमाप, बांधकामाचा प्रकार, पूर्णत्वाचे वर्ष आणि करआकारणीचा आधार समजावून सांगावा. हरकतींचा निष्पक्षपणे विचार करूनच अंतिम करआकारणी करावी, अशी मागणीही पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.

नागरिकांच्या हक्कांसाठी, पारदर्शक कारभारासाठी आणि न्याय्य घरपट्टीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष कटिबद्ध आहे.