चिपळूण (सुनील साळवी) : शहरातील मतेवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचे सोळा लाखांचे काम चिपळूण पालिकेच्या वर्कऑर्डर शिवाय करणारा ठेकेदार हा आता चांगलाच अडचणीत येणार आहे. या विषयात पालिका प्रशासनाने हात वर केले असून ठेकेदाराने कोणाच्या आदेशाने काम केले असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे चिपळूण पालिका या कामाचे बिल अदा करणार नसून ठेकेदाराला केलेल्या लाखो रुपयांच्या बिलावर पाणी सोडावे लागणार आहे.
चिपळूण नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत ठाकरे गटाचे नगरसेवक फैसल कास्कर यांनी सर्वप्रथम मतेवाडी रस्त्याचा विषय सभागृहाच्या निदर्शनास आणला. तेव्हा आम्हाला या कामाची कोणतीच कल्पना नाही असे सांगून प्रशासनाने हात झटकले.या प्रकरणाशी जर प्रशासनाचा संबंध नसेल तर त्या ठेकेदाराने कोणाच्या सांगण्यावरून लाखो रुपयांचे काम पालिकेच्या वर्कऑर्डर शिवाय केले ? त्या ठेकेदाराने बिल न घेताच काम करून देण्याचे ठरवले आहे का? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. ठेकेदाराला कोणीतरी जबाबदार व्यक्तीने सांगितल्याशिवाय तो काम करील का अशीही चर्चा ऐकायला मिळते. नियमबाह्य पद्धतीने ठेकेदाराकडून काम करून घेण्याची नवी पद्धत सुरू झाली आहे का? अशी देखील विचारणा होत आहे. या संदर्भात मुख्याधिकारी संजय जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,या कामाबाबत आपल्याला काहीच माहिती नाही.
वर्कऑर्डर शिवाय ठेकेदाराने काम केल्यामुळे नगरपालिका या कामाचे पैसे अदा करण्याचा प्रश्नच येत नाही.यापूर्वी कोणतेही वाद-विवाद झाले की पत्रकारांना नगरपालिका कार्यालयात बोलावून वस्तुस्थिती काय आहे त्याची माहिती दिली जात असे आता मात्र तसे दिसत नाही.
