गुहागर : तालुक्यातील श्रृंगारतळी येथील हल्ला प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून निष्पक्ष व कठोर कारवाई करण्याबाबत चर्मकार विकास मंडळ गुहागरच्या वतीने पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की,
श्रृंगारतळी येथे रोहिदास (चर्मकार) समाजातील बांधवांवर झालेल्या गंभीर हल्ल्याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, सदर घटनेला आज सात दिवस उलटून गेले तरीही प्रशासनाकडून ठोस कारवाई झालेली नाही. या पार्श्वभूमीवर समस्त रोहिदास समाजाच्या वतीने काही मागण्या करण्यात आल्या आहेत. घटना घडून ७ दिवस झाले तरीही मुख्य आरोपी मोकाट फिरत आहेत. त्यांना तात्काळ बेड्या ठोकण्यात याव्यात.
गुहागर पोलीस ठाणे यांच्याकडून आरोपींना अटक करण्यात अपयशी ठरत आहे, की आरोपींना जाणीवपूर्वक पाठिशी घातले जात आहे, अशी शंका निर्माण झाली आहे. गुन्हेगार मोकाट राहिल्याने पीडित कुटुंबात आणि समाजात भीतीचे वातावरण आहे. कायद्यावर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांमध्ये प्रशासनाच्या या संथ कारभारामुळे तीव्र संताप व नाराजीची भावना आहे.
झालेल्या हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींवर कडक कायदेशीर कलमांर्तगत गुन्हा चालवला जावा, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. तऱी या प्रकरणाची स्वतः गांभीर्याने दखल घेऊन संबंधित तपास अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश द्यावेत. जर आगामी ४८ तासांत आरोपींना अटक करून योग्य कारवाई झाली नाही, तर समस्त रोहिदास (चर्मकार) समाजाच्या वतीने तीव्र लोकशाही व सनदशीर मार्गाने पोलीस कार्यालयावर आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा चर्मकार विकास मंडळ गुहागर तालुका अध्यक्ष विजय जानवळकर, जेष्ठ समाजसेवक भाई पालशेतकर,सल्लागार अशोक जानवळकर, जिल्हा सदस्य विनोद जानवळकर, सचिन कोडविलकर, खजिनदार संदिप कोडविलकर रमेश सावर्डेकर,राहुल सातपुते यांनी दिला आहे.