चिपळूण : खेड तालुक्यातील सोनगाव येथील नाला प्रदूषणप्रकरणी गुरुवारी खेर्डी येथील एमआयडीसी कार्यालयात प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उद्योग प्रतिनिधी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक पार पडली. आंदोलनानंतर प्रथमच झालेल्या या बैठकीत सोनगावच्या दोन्ही नाल्यांवर ऑनलाइन वॉटर मॉनिटरिंग सिस्टीम उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच ए संपमधून कोणत्याही परिस्थितीत दूषित पाणी सोडले जाणार नसल्याची लेखी हमी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ग्रामस्थांना दिली.
बैठकीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत, उपप्रादेशिक अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता सतीश पवार, उपअभियंता पिंपळे, हळदणकर, सीईटीपीचे व्यवस्थापक भूषण शिंदे, लोटे उद्योजक संघटनेचे अध्यक्ष राज आंब्रे, ठाकरे शिवसेनेचे विभागप्रमुख राजू घाग, पंचायत समिती सदस्या रेवती घाग, सोनगावच्या सरपंच भारती पडवळ, उपसरपंच मिलिंद घोरपडे, पर्यावरण समितीचे अध्यक्ष विष्णू साळुंखे, उपाध्यक्ष संदीप घाग, प्रथमेश घाग, दत्ताराम घाग, दाभोळखाडी संघर्ष समितीचे सल्लागार दिलीप दिवेकर, प्रमोद माळी, शेखर मोरे, विनायक घाग, शंकर अदावडे आदी उपस्थित होते.
बैठकीत दोन्ही नाल्यांवर ऑनलाइन वॉटर मॉनिटरिंग यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. या यंत्रणेमुळे नाल्यातील पाण्याच्या गुणवत्तेवर चोवीस तास ऑनलाइन देखरेख ठेवता येणार असून प्रदूषणाची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करणे शक्य होणार आहे.
याशिवाय, ए संपमधून दूषित पाणी सोडले जाणार नसल्याची लेखी हमी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ग्रामस्थांना दिली. या निर्णयामुळे भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रशासन आणि संबंधित यंत्रणा अधिक जबाबदारीने काम करतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
सोनगाव येथील नाल्यांवर ऑनलाइन वॉटर मॉनिटरिंग यंत्रणा उभारणार..खेर्डी एमआयडीसीतील संयुक्त बैठकीत निर्णय ‘ए’ संपमधून दूषित पाणी सोडणार नसल्याची लेखी हमी..
