रायगड : जिल्ह्यासह रोह्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अनेकविध सामाजिक विधायक व लोकोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. बौद्ध समाज युवा संघ रायगड, यंग युनिटी वेल्फेअर असोसिएशन, आदिवासी ठाकूर सामाजिक उन्नती संस्था रोहा आणि आदिम जमात कातकरी समाज संघटना रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. या उपक्रमाला युवक, युवती आणि महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला असून समाजात मानवतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम ठरला.
शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली, तर अनेकांनी आरोग्य व नेत्र तपासणीचा लाभ घेतला.
या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. समाजहिताचा विचार करत अशा सेवा व मानवतावादी उपक्रमांची आजच्या काळात मोठी गरज असल्याचे मतही मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बौद्ध समाज युवा संघ रायगड तसेच सहयोगी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रेरणादायी आणि मानवतावादी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. समाजासाठी प्रेरणादायी ठरलेला हा उपक्रम भविष्यातही अशाच सामाजिक कार्यांना चालना देईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.