लांजा: लांजा ते दाभोळे रोडवर कोर्ले फाट्याजवळून एक रिक्षा चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कोल्हापूर येथील एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुणाल अनिल सुर्वे (वय ३० वर्ष, रा.लांजा भटवाडी, ता.लांजा) यांची ८० हजार रुपये किंमतीची रिक्षा (क्रमांक एम.एच.०८.ए.एक्यु.३९२१) ही ११ एप्रिल रोजी रात्री १० ते १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान कोर्ले फाट्याजवळ उभी होती. ही रिक्षा चोरीला गेल्याची तक्रार १३ एप्रिल रोजी पहाटे लांजा पोलीस ठाण्यात देण्यात आली.
यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविल्यानंतर संबंधित रिक्षा मलकापूर-कोल्हापूर मार्गावर आढळून आली तर महेश यादव हा देखील रिक्षा सोबत होता. त्यानंतर त्याला लांजा पोलीसांनी ताब्यात घेतले. या चोरीप्रकरणी पोलिसांनी महेश रमेश यादव (वय ४२, रा.साई रेसिडन्सी शिंगणापूर, ता.करवीर, जि.कोल्हापूर) याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अधिक तपास पो.हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे करत आहेत.
या चोरी प्रकरणी पोलिसांनी यशस्वी तपास करून महेश रमेश पवार (राहणार करवीर) या संशयित आरोपीला अटक केली असून त्याने चोरलेली रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे तसेच सांगली विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही त्याने चोरलेली आणखी एक रिक्षा पोलिसांनी जप्त केली आहे.
