रत्नागिरी : गेल्या १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलेली ३१ मे २०२६ पर्यंत महामार्ग पूर्ण करण्याची मुदत उलटूनही महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यातच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महामार्ग पूर्ण होण्यासाठी आणखी एक ते दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती माध्यमांशी बोलताना दिल्याने कोकणवासीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांनी संबंधित प्रशासनाला निवेदनवजा इशारा दिला असून, महामार्गावरील अपूर्ण कामे, नागरिकांच्या जीवितास निर्माण झालेला धोका आणि प्रशासनाच्या कथित हलगर्जीपणाबाबत जनहित याचिका दाखल करण्यापूर्वीची अंतिम कायदेशीर नोटीस देण्याची भूमिका घेतली आहे.
कदम यांनी यापूर्वीही दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर केले होते. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथील भूसंपादन समन्वय शाखेने ३० एप्रिल २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी, राजापूर तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून अर्जाचे अवलोकन करून नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही महामार्गावरील परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचा दावा कदम यांनी केला आहे.
