पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील मोशी येथील कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेबाबत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याने त्यांनी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून, पीडित कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. या दुर्घटनेनंतर आज ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच पीडित कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या दुःखात सहभागी होत आवश्यक मदतीचे आश्वासन दिले.

या संदर्भात त्यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ (X) सोशल मीडिया खात्यावर पोस्ट करत म्हटले की, ही घटना अत्यंत दुर्दैवी असून घनकचरा व्यवस्थापनासारखा महत्त्वाचा विषय दीर्घकाळ दुर्लक्षित राहिल्याचे हे गंभीर उदाहरण आहे. पिंपरी चिंचवड शहरातून दररोज सुमारे १,४०० ते १,५०० टन कचरा जमा होत असल्याचे नमूद करत त्यांनी या कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या गॅसचे शास्त्रीय व सुरक्षित व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध नसल्याची खंत व्यक्त केली. घनकचरा व्यवस्थापनासाठी शासन स्तरावर स्वतंत्र पूर्णवेळ विभाग स्थापन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

तसेच, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि राज्य शासनाने दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. या प्रकरणातील कॉन्ट्रॅक्टर, महानगरपालिका अधिकारी ज्यांनी कचऱ्या डेपोजवळ बांधकाम परवानगी दिली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याशी त्यांनी चर्चा केली.

दरम्यान, मोशी येथील या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कचरा व्यवस्थापनाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.