आंबडस : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषीविद्यापीठांतर्गत शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाचे कृषीदुतांद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक व शाश्वत कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी तसेच शेतीतील उत्पादनक्षमता व आर्थिक उत्पन्न वाढावे, या उद्देशाने कृषिदूतांच्या वतीने विविध कृषी विषयांवर प्रात्यक्षिके व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमांतर्गत चारा प्रक्रिया व चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन, पशुधन व्यवस्थापन, पीक संरक्षण,बीज उगवण व बीजप्रक्रिया, सेंद्रिय शेती, शेणखत (FYM) व कंपोस्ट खत निर्मिती, शेततळ्याचे महत्त्व व उपयोग याबाबत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पिकांमध्ये आढळणाऱ्या उपयुक्त व हानिकारक कीटकांची ओळख, त्यांचे पीक उत्पादनावर होणारे परिणाम आणि कीड व्यवस्थापनाबाबतही माहिती देण्यात आली.

यासोबतच शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषीविषयक योजना, अनुदाने व उपलब्ध शासकीय सुविधांबाबत माहिती देऊन त्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा योग्य वापर, उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन आणि कमी खर्चात शाश्वत शेती करण्याचे महत्त्व यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या उपक्रमासाठी कृषिदूत अथर्व जगदाळे, रणजीत हिरवे, रोहन जगदाळे सोहम मडके, समर्थ भोसले आणि अनिरुद्ध कोळेकर यांनी सक्रिय सहभाग घेतला. प्रात्यक्षिकांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक कृषी पद्धती प्रत्यक्ष समजून घेण्यास मदत झाली असून, शेतकऱ्यांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे