महाड : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या राजकीय तिढ्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री भरतशेठ गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीनंतर सोमवारी, १७ ऑगस्ट रोजी ही घोषणा करण्यात आली.ही बातमी महाडमध्ये येतात महाड मधील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात भंडारा उधळून जल्लोष केला.

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून रस्सीखेच सुरू होती. यापूर्वी रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, त्यावर भरतशेठ गोगावले यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर तसेच महायुतीतील अंतर्गत मतभेदांमुळे हा निर्णय रखडला होता.

रायगडचे पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळेल, असा विश्वास भरतशेठ गोगावले यांनी अनेकदा व्यक्त केला होता. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाही त्यांनी येत्या काही दिवसांत पालकमंत्रिपदाचा निर्णय होईल, असे संकेत दिले होते. अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.