चिपळूण : चिपळूण शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गोवळकोट विभागाच्या वतीने पवित्र श्रावण सोमवारनिमित्त श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी मंदिराच्या पाटांगणात भाविकांसाठी खिचडी वाटपाचा सामाजिक व भक्तीमय उपक्रम आयोजित करण्यात आला. श्रावण महिन्याच्या धार्मिक वातावरणात मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रेम, आपुलकी आणि सेवाभावाने प्रसादरूपी खिचडीचे वाटप करण्यात आले.
श्रावण सोमवार हा भगवान शिवभक्तांसाठी विशेष श्रद्धेचा दिवस मानला जातो. या धार्मिक पर्वाचे औचित्य साधून भाविकांच्या सेवेत सहभागी होत शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत खिचडीचा प्रसाद स्वीकारला. या उपक्रमास गोवळकोट विभागप्रमुख व उद्योजक संकेत शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच शहर सचिव प्रशांत मुळये यांनी उपक्रमाच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी शहरप्रमुख सचिन (भैया) कदम, युवासेना शहरप्रमुख पार्थ जागुष्टे, नगरसेविका कांचन शिंदे, वैशाली कदम, नगरसेवक अजय भालेकर, उपशहरप्रमुख राजू विखारे, यांच्यासह विभाग प्रमुख प्रकाश गांगण, उपविभाग प्रमुख नवीनचंद्र किल्लेकर, दिपक कदम, प्रकाश इचले, अमर शिंदे, बाबा टाकळे, पिंट्या कोवळे, उपेंद्र हरवडे, महेश हरवडे, विशाल बेचावडे, महेंद्र खापरे, सचिन खापरे, शाखा प्रमुख सतिश शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. धार्मिक श्रद्धेला सामाजिक सेवेशी जोडत भाविकांच्या सेवेसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘सेवा हीच भक्ती’ या भावनेचा प्रत्यय आला. शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सामूहिक सहभागामुळे हा उपक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला.
