मुंबई : भाजपा सरकारच्या काळात परिक्षांना पेपरफुटीचे ग्रहण लागले असून सरकार एकही परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नाही. नीट, टीईटी पेपरफुटीनंतर आता MMRDA च्या अभियांत्रिकी भरती परीक्षेत मोठा घोटाळा झाला आहे. या परिक्षेचा १४ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर झालेला निकाल आणि गुणवत्ता यादीसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये गंभीर अस्वस्थता निर्माण झाली आहे. मेरिट लिस्टच्या प्राथमिक अभ्यासातून गुणांतील काही लक्षणीय तफावती, अत्यंत उच्च गुण व रँक तसेच इतर अभियांत्रिकी परीक्षांतील संबंधित उमेदवारांच्या कामगिरीशी तुलना करता गंभीर प्रश्न समोर आले आहेत. MMRDA अभियांत्रिकी भरती परीक्षेतील घोटाळ्याची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सखोल चौकशी करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी केली आहे.

टिळक भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस धनंजय शिंदे पुढे म्हणाले की, MMRDA ने २३५ जागांसाठी घेतलेल्या परिक्षेत ज्या विद्यार्थांना २०० पैकी १९० पेक्षा जास्त मार्क्स मिळालेत त्याच्या अभ्यास केला असता असे निदर्शनास आले आहे की, मेरिट लिस्टमधील १, २, व ३ क्रमांकाचे विद्यार्थी एकाच केंद्रावरील आहेत, ४, ५ व ६ क्रमांकाचे विद्यार्थी एकाच केंद्रावरील आहेत. तसेच ७,८ व ९, १०, ११ आणि १४ व १५ क्रमांकाचे विद्यार्थी हे एकाच परीक्षा केंद्रावरील आहेत. अभियांत्रिकीच्या ज्या वेगवेगळ्या विभागातील परीक्षामध्ये याच मेरिट लिस्टमधील विद्यार्थांना १०० पैकी ७.५, १० व १५ असे गुण मिळाले आहेत. MMRDA च्या परिक्षेत १९७, १९८ मार्क्स मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी BMC च्या अभियांत्रिकी परिक्षेत मात्र १०, १५ मार्क्स मिळवले आहेत. जी चार मुले टॉपर आली आहेत त्यांचे वडील नगर विकास विभागातील वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत, हे सर्व पाहता एमएमआरडीएच्या परिक्षेत मोठा घोटाळा झालेला दिसत आहे. याची सखोल चौकशी करून परिक्षा रद्द करावी. सर्व परिक्षा ऑफलाईन घ्याव्यात, अशी मागणी धनंजय शिंदे यांनी केली आहे. काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून त्यांना मिळवून देण्यासाठी एमएमआरडीएला जाब विचारू असेही शिंदे म्हणाले.