कोल्हापुर : कोल्हापुरात अवैध गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. कोल्हापूर-सांगली बायपास रोडवर सापळा रचून पोलिसांनी १ कोटी ७५ लाख ६८ हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली. यामध्ये व्हिस्कीच्या तब्बल ८७ हजार ८४० बाटल्या आढळून आल्या आहेत.
गोवा राज्यातून कर्नाटकमार्गे चोरट्या मार्गाने ही दारू महाराष्ट्रात आणली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एमएच-१८-बीजी-००६७ क्रमांकाचा अशोक लेलंड ट्रक पकडला. दारूसह ट्रक असा एकूण १ कोटी ९५ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी हरियाणातील ट्रकचालक मुसफान उर्फ जावेद खान याला ताब्यात घेण्यात आले असून, जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि सहायक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
