चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील धामापूर-कुंभारखाणी खुर्द येथील नऊ वाड्यांमधील ग्रामस्थांनी भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शनिवारी, दि.१५ ऑगस्ट रोजी एकत्र येत गावाच्या विकासासाठी आणि स्वच्छतेसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले. ‘गाव आपले, जबाबदारीही आपली’ या भावनेतून ग्रामस्थांनी पुढाकार घेत गावातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासह स्वच्छता मोहीम राबवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला.
गावातील भराडीन देवी,वाघजाई देवी मंदिरात दर्शन घेऊन उपक्रमाला सुरुवात झाली.कुंभारखाणी खुर्द पंचक्रोशीतील गावणवाडी,भोजनेवाडी,मानेवाडी,गडगेवाडी,हळद वाडी,खडकेवाडी,चाफेवाडी, भेंलेवाडी,बौद्धवाडी येथील रस्त्यालगत असणारी गवत,झाडे,झुडपं आणि वाहनांना अडथळे होणारी झाडं तोडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली गावात अनेक वेळा वीज खंडित होणे प्रकार वाढले होते यावर उपाययोजना म्हणून स्वच्छता मोहिमेच्या दरम्यान गावागावातील विद्युत पोलावर जमा झालेल्या वेली झाडांच्या फांद्या या देखील तोडून विजेचे खांब स्वच्छ करण्यात आले. याचबरोबर येथे येथील रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे जेसीबीच्या सहाय्याने खडी माती टाकून भरवण्यात आले या संपूर्ण सामाजिक उपक्रमामध्ये जेसीबी, ट्रॅक्टर,रोलर,गॅस कटर, ग्रास कटिंग या मशनरीचा वापर करण्यात आला ग्रामस्थ मंडळी देखील एकोप्याने गावच्या सामाजिक कार्यात आनंदाने सहभागी झाली होते.
स्वच्छता मोहिमांमध्ये अनेक टन कचरा देखील गोळा करण्यात आला. याची नियोजनबद्ध विल्हेवाट लावण्यात आली.गावात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, वयोवृद्ध माणसांना दूरवर उपचारासाठी न्यावे लागत आहे गावात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही, रस्ते खराब असल्यामुळे खाजगी वाहने देखील येथे येत नाहीत विजेची समस्या देखील गंभीर आहे या सर्वावर उपाययोजना होण्यासाठी आम्ही ग्रामस्थ हातात हात घालून काम करणार असून पुढील काळात ग्रामस्थांच्या मदतीने कुंभारखानी खुर्द पंचक्रोशी मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुमित मिरगल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
स्वातंत्र्यदिन केवळ ध्वजारोहण, देशभक्तीपर कार्यक्रम आणि शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता त्यातून गावाच्या विकासासाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला. त्यानुसार गावातील विविध वाड्यांमधील नागरिक एकत्र आले. गावातील अंतर्गत रस्त्यांवर पडलेले खड्डे, रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत, साचलेला कचरा तसेच अस्वच्छ परिसराची पाहणी करून प्रत्यक्ष श्रमदानातून स्वच्छता करण्यास सुरुवात करण्यात आली.
