चिपळूण : संत श्री सेना महाराज प्रतिष्ठान, चिपळूण यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त चिपळूण तालुक्यातील नाभिक समाज बांधवांसाठी ‘संत श्री सेना महाराज आरती गायन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून संत श्री सेना महाराज यांच्या भक्तीपरंपरेला उजाळा देतानाच समाजबांधवांना आपल्या गायनकलेचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी गणपतीची एक आणि संत श्री सेना महाराज यांची एक, अशा आपल्या पसंतीच्या दोन आरत्या गायच्या आहेत. मात्र परीक्षण केवळ संत श्री सेना महाराज यांच्या आरतीचे करण्यात येणार आहे. स्पर्धकाने मोबाईल आडवा धरून दोन्ही आरत्यांचा कमाल सात मिनिटांचा एकच सलग व्हिडिओ तयार करून पाठवायचा आहे. व्हिडिओमध्ये कट, एडिटिंग किंवा वेगवेगळे भाग जोडलेले नसावेत. आरती सुरू करण्यापूर्वी स्पर्धकाने आपले नाव, गाव आणि संपर्क क्रमांक सांगणे आवश्यक आहे. व्हिडिओमध्ये स्पर्धकाचा चेहरा स्पष्ट दिसणे बंधनकारक असून, कोरस किंवा सहकारी हे केवळ स्पर्धकाच्या कुटुंबातीलच असावेत. तसेच एका व्हिडिओ मधील कोरस दुसऱ्या स्पर्धकाच्या व्हिडीओ मध्ये असू नयेत. घरगुती अथवा सार्वजनिक गणेशमूर्तीसमोर आरतीचे सादरीकरण करावे. टाळ-मृदंग, हार्मोनियम किंवा अन्य वाद्यसंगीताचा वापर करता येईल; मात्र गायनाचा आवाज स्पष्ट ऐकू येणे आवश्यक आहे.
रेकॉर्ड केलेले गायन, ऑटो-ट्यून, कृत्रिम आवाज अथवा आधीपासून तयार केलेल्या ऑडिओवर लिपसिंक केल्यास प्रवेशिका अपात्र ठरविण्यात येईल. प्रत्येक स्पर्धकाला केवळ एकच प्रवेशिका पाठवता येणार असून व्हिडिओवर वॉटरमार्क, जाहिरात किंवा राजकीय प्रचार नसावा अशी माहिती सेक्रेटरी श्री महेंद्र साळुंके यांनी दिली आहे.
संत श्री सेना महाराज प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवानिमित्त संत श्रीसेना महाराज आरती गायन स्पर्धा..
