महाड : गेल्या दीड ते पावणेदोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला असून, महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याने रायगड शिवसेनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बुधवारी सायंकाळी भरतशेठ गोगावले यांचे महाडमध्ये आगमन होताच शिवसैनिकांनी त्यांचे भव्य स्वागत करून जल्लोष केला.
पालकमंत्री गोगावले यांच्या स्वागतासाठी महाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिक आणि समर्थक मोठ्या संख्येने जमले होते. त्यांच्या आगमनावेळी तब्बल सहा जेसीपीमधून पुष्पवृष्टी आणि गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत ‘भरतशेठ गोगावले आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
पालकमंत्री गोगावले यांच्या महाड आगमनाची वेळ दुपारी तीन वाजता निश्चित करण्यात आली होती. मात्र, अलिबागहून महाडच्या दिशेने येताना नागोठणे, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे यांसह विविध ठिकाणी शिवसैनिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यामुळे त्यांच्या महाड आगमनाला रात्री आठ वाजले.
दरम्यान, नातेखिंड येथून फुलांनी सजवलेल्या वाहनातून मोटारसायकल रॅली काढत पालकमंत्री गोगावले यांना महाड शहरात आणण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, घोषणाबाजी आणि फटाक्यांच्या आतषबाजीने या रॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले.
महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर पालकमंत्री गोगावले यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन झाले. येथे त्यांच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. सहा जेसीपीमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच गुलालाची उधळण करण्यात आली. त्यानंतर व्यासपीठासमोर उभारलेल्या भव्य पोकलेनवर लावलेल्या प्रचंड मोठ्या हाराने पालकमंत्री गोगावले यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या नावाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यांच्या पालकमंत्रीपदामुळे रायगडच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही यावेळी शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात आला.
या स्वागत सोहळ्यास पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या पत्नी सुषमा गोगावले, मुलगा तथा जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले, मुलगी कोमल गोगावले, महाड पंचायत समितीच्या सभापती प्रेरणा सावंत, उपसभापती सुरेश महाडिक, तालुकाप्रमुख बंधू तरडे, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक-नगरसेविका, शिवसेनेचे विविध पदाधिकारी तसेच असंख्य शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर प्रथमच महाडमध्ये झालेल्या भरतशेठ गोगावले यांच्या या भव्य स्वागतामुळे महाड शहरात शिवसेनेचा मोठा शक्तिप्रदर्शनाचा माहोल पाहायला मिळाला.