दापोली : वन विभागाकडून वृक्षतोडीस परवानगी देताना त्याच प्रमाणात वृक्षलागवड करण्याचा महत्वपूर्ण निकष ठरवण्यात आला आहे. मात्र, शासनाच्या या नियमांची अंमलबजावणी अनेकदा कागदोपत्रीच राहते आणि सर्रास वृक्षतोड सुरू राहते.
मात्र, दापोलीतील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत शिगवण यांनी या नियमांचे पालन करून एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. वन विभाग दापोली यांच्याकडून ऑक्टोबर २०२५ ते जून २०२६ या कालावधीत आवश्यक परवानगी घेऊन त्यांनी आपल्या शेतातील वृक्षतोड केली होती. या वृक्षतोडीतून त्यांना चांगला आर्थिक मोबदला देखील मिळाला., मात्र, मिळालेल्या आर्थिक फायद्यावरच समाधान न मानता दापोली तालुक्याचे वनाच्छादन अबाधित राहावे, जैवविविधतेचे संवर्धन व्हावे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवाई टिकून राहावी, या उद्देशाने त्यांनी यावर्षीच्या पावसाळ्यात पर्यायी वृक्षलागवडीचा निर्णय घेतला. काहीवेळा वृक्षतोड अपरिहार्य ठरली, तरी त्या बदल्यात निसर्गाला पुन्हा काहीतरी देण्याची जबाबदारीही आपलीच आहे… हा अत्यंत संवेदनशील आणि पर्यावरणपूरक संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.
तालुक्यातील वाघवे चिखली या गावी शिगवण यांनी तब्बल २५० रोपांची लागवड केली आहे. यामध्ये ५० आंबा, १०० काजू आणि १०० सुपारीच्या रोपांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही लागवड केवळ पर्यावरण संवर्धनापुरती मर्यादित नसून, भविष्यात या झाडांमधून आर्थिक उत्पन्नाचे साधनही निर्माण होणार आहे. त्यामुळे वृक्षतोडीनंतर त्याच प्रमाणात किंवा शक्य तितक्या अधिक प्रमाणात नवीन झाडे लावणे, त्यांचे संगोपन करणे आणि पुढील पिढ्यांसाठी हिरवाई जपणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश शिगवण यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.
या वृक्षलागवडीसाठी दापोली वन विभागाचे वनरक्षक विश्वंभर झाडे आणि शुभांगी गुरव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी दापोली तालुक्यातील शेतकरी व व्यापारी शाहबाज महाडिक, तसेच चिखली-वाघवे परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
वृक्षतोडीची भरपाई केवळ कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष जमिनीवर नवी हिरवाई उभी करून करण्याचा हा चंद्रकांत शिगवण यांचा प्रयत्न निश्चितच इतर शेतकरी आणि नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो.
वृक्षतोडीनंतर पुन्हा उभी राहतेय हिरवाई; शेतकरी चंद्रकांत शिगवण यांचा पर्यायी वृक्षलागवडीचा आदर्श..
