खेड : येथील नगरपरिषद हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे भूमिपूजन होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला असतानाही प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झालेली नाही. या रखडलेल्या कामाबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या खेड तालुका शाखेच्या वतीने प्रशासनाला जाब विचारत काम तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
ना. योगेशदादा कदम यांच्या पुढाकाराने २४ ऑगस्ट २०२४ रोजी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, भूमिपूजनानंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने नागरिक तसेच आंबेडकरी समाजात नाराजी व्यक्त होत होती.
योगेशदादा कदम यांच्या विकासकामांचे आरपीआयकडून कौतुक
दापोली विधानसभा मतदारसंघात ना. योगेशदादा कदम यांच्या पुढाकारातून विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असून, अनेक प्रलंबित कामांना गती मिळत असल्याची सकारात्मक भूमिका आरपीआयने घेतली आहे.
योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून मतदारसंघातील अनेक विकासकामांना गती मिळत आहे. त्यांच्या विकासकामांबाबत आमचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. मात्र, खेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे कामही त्याच गतीने मार्गी लागणे आवश्यक आहे. एका बाजूला विविध विकासकामे सुरू असताना या महत्त्वाच्या सभागृहाचे काम दोन वर्षे प्रलंबित राहणे योग्य नाही,” अशी भूमिका आरपीआयचे युवक कोकण प्रदेशाध्यक्ष सुशांतभाई सकपाळ यांनी मांडली.
निधीचा प्रश्न सुटला; ३० टक्के निधी प्राप्त
सभागृहाच्या कामासाठी निधी उपलब्ध नसल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे निधीची नेमकी स्थिती काय, याबाबत आरपीआयने प्रशासनाकडे माहिती मागितली होती. याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३० टक्के निधी प्राप्त झाल्याचे सांगितले असून, येत्या आठवड्यात सभागृहाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या कामाला अखेर सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
“भूमिपूजन झाले, आता काम सुरू करण्याची तारीखही सांगा”
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह हे केवळ एक बांधकाम नसून खेड शहरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक चळवळीचे महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. दोन वर्षांपासून हे काम रखडले होते. आता बांधकाम विभागाने ३० टक्के निधी प्राप्त झाल्याचे सांगून येत्या आठवड्यात काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रशासनाने दिलेला शब्द पाळून प्रत्यक्ष काम तातडीने सुरू करावे,” असे सुशांतभाई सकपाळ यांनी स्पष्ट केले.
“योगेशदादा कदम यांच्या पुढाकारातून मतदारसंघातील विविध विकासकामांना गती मिळत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे कामही तातडीने मार्गी लागले पाहिजे. आता केवळ आश्वासन नको, तर येत्या आठवड्यात प्रत्यक्ष बांधकाम सुरू झालेले दिसले पाहिजे. अन्यथा, आरपीआयच्या वतीने जनतेला सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल,” असा इशाराही सकपाळ यांनी दिला.
नगरपरिषद व बांधकाम विभागाला जाब
खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने सभागृहाच्या कामातील उर्वरित प्रशासकीय व तांत्रिक अडथळे तातडीने दूर करून काम सुरू करावे, अशी मागणी आरपीआयने केली आहे.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मंजूर झालेले सभागृह केवळ भूमिपूजनापुरते मर्यादित राहणे खेडच्या जनतेला मान्य नाही. आता ३० टक्के निधी प्राप्त झाल्याचे बांधकाम विभागाने स्पष्ट केले असून, येत्या आठवड्यात काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करावी,” अशी भूमिका खेड तालुका आरपीआयने घेतली आहे.
निवेदन देताना कोकण प्रदेश सरचिटणीस सी. आर. कांबळे, युवक कोकण प्रदेशाध्यक्ष सुशांतभाई सकपाळ, जिल्हा पर्यावरण अध्यक्ष ॲड. सुरेंद्र तांबे, जिल्हा कोषाध्यक्ष गौतम तांबे, जिल्हा संपर्कप्रमुख गौतम लखू तांबे, तालुका अध्यक्ष बाबाराम पवार, सरचिटणीस जितेंद्र तांबे, कार्याध्यक्ष मिलिंद तांबे, उपाध्यक्ष सखाराम सकपाळ, मोहिराम जाधव, गोपीनाथ जाधव, बाळकृष्ण देवळेकर, सुरेश पवार, कोषाध्यक्ष सुरेश तांबे, संघटक गौतम जाधव, सचिव सुधीर जाधव, प्रवीण जाधव, संघटक सचिव आनंद पवार, युवक अध्यक्ष विकास धुत्रे, जिल्हा युवक संपर्कप्रमुख गणेश शिर्के, अनिल जाधव, राहुल कापसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.