श्रीवर्धन : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच श्रीवर्धन तालुक्यात दाखल झालेल्या पालकमंत्र्यांचे शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि घोषणाबाजीने श्रीवर्धन शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
श्रीवर्धनमध्ये आगमन झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी शहराची ग्रामदेवता श्री आई सोमजाई देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘पालकमंत्री चषक श्रीवर्धन दहीहंडी स्पर्धेला’ त्यांनी उपस्थिती लावत गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या.
दहीहंडी उत्सवानिमित्त शहरातील प्रमुख ठिकाणी गोविंदा पथकांचा उत्साह पाहायला मिळाला. थरावर थर रचत दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांनी जोरदार प्रयत्न केले, तर ढोल-ताशांच्या निनादात नागरिकांनीही मोठी गर्दी केली.
पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीवर्धनकरांनी केलेल्या उत्स्फूर्त स्वागताबद्दल पालकमंत्र्यांनी नागरिकांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला रायगड लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख अनिल नवगणे, रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, संपर्कप्रमुख अरुण चाळके, विपुल उभारे, सचिन पाटेकर, सुकुमार भाई तोंडलेकर, ज्ञानदेव पवार यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीवर्धनमध्ये पालकमंत्र्यांच्या स्वागताचा जल्लोष आणि दहीहंडीचा उत्साह नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे अधिकच रंगला.