चिपळूण : रक्षाबंधनाच्या निमित्ताने चिपळूण तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मनगटावर राखी बांधून त्यांच्या सेवेला सलाम केला.
यावेळी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेसमोरही रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अजितदादांनी आपल्या कार्यकाळात सर्वसामान्य नागरिक, महिला, युवक, शेतकरी तसेच समाजातील विविध घटकांसाठी केलेल्या कार्याचा आणि सामाजिक बांधिलकीचा यावेळी आवर्जून उल्लेख करण्यात आला. त्यांच्या विकासाभिमुख विचारांना व लोकाभिमुख कार्याला अभिवादन करत महिला कार्यकर्त्यांनी आदर व्यक्त केला.
यावेळी तालुकाध्यक्ष नितीन उर्फ आबू ठसाळे आणि प्रदेश महिला सरचिटणीस दिशा दाभोळकर यांनी अजितदादांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या नेतृत्वाखाली समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी करण्यात आलेल्या विविध लोकहिताच्या कामांची आठवण करून दिली. अजितदादांचे सर्वसामान्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि विकासाची दूरदृष्टी ही कायम प्रेरणादायी राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला तालुकाध्यक्ष नितीन उर्फ आबू ठसाळे, महिला शहराध्यक्ष आदिती देशपांडे, दिशा दाभोळकर, शिवानी पवार, वर्षा जागुष्टे, रवीना गुजर, मनाली जाधव, पुनम भोजने, डॉ. रहिमत जबले, शहनाज वांगडे, पांडू शेठ माळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
रक्षाबंधनाच्या या उपक्रमातून पोलीस आणि समाज यांच्यातील जिव्हाळ्याचे व विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. महिलांनी पोलिसांना राखी बांधताना, “आपण समाजाचे रक्षण करता, म्हणून आज आम्ही आपल्या मनगटावर विश्वासाची राखी बांधत आहोत,” अशी भावना व्यक्त केली.
उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.