खेड : जागतिक अंध दिन आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून यशस्नेहा ट्रस्ट, यशतेज फाउंडेशन आणि स्वामी समर्थ डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मंडणगड तालुक्यातील घराडी येथील स्नेहज्योती ऑडिटोरियममध्ये आनंददायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात दृष्टिबाधित मुलांसाठी प्रश्नमंजुषा, मनोरंजक स्पर्धा, गाणी आणि भजनांचा सुरेल कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पूजा आणि शमसूद्दीन या दोन होतकरू मुलांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले, तर गाण्यांमध्ये सहभाग घेणाऱ्या मुलांना रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी मुलांसोबत गप्पा, गाणी आणि भजनांमध्ये सहभागी होत त्यांचा आनंद द्विगुणित केला. यावेळी यशस्नेहा ट्रस्टचे संस्थापक सुनील कामत, यशतेज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲड. यश घोसाळकर, स्वामी समर्थ डेव्हलपर्सच्या संस्थापक सौ. जान्हवी मोरे, समाजसेविका प्रतिभा सेनगुप्ता, प्राजक्ता ताम्हणकर, सारा फराडे, सनम शेठ, छाया तलाठी, सलोनी पाटील, सुनिता वाडीले, समाजसेवक लक्ष्मण मोरे, निलेश वाडकर, शाम कोळंबे, अमोल दळवी, रोहन वाडीले, सोनू गोले, संगीत शिक्षक मनीष वायग्रामबरे आणि माजी सैनिक शशिकांत कामत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दृष्टिबाधित मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा आणि त्यांच्या जगण्याला नवी उमेद देणारा हा सोहळा उत्साहात पार पडला. अशा स्नेहमेळाव्यांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
जागतिक अंध दिनानिमित्त स्नेहज्योतीमध्ये आनंदोत्सव; दृष्टिबाधित मुलांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य…!
