खेड : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष विनायक वामन निकम यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी दि. १६/१०/२०२६ रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, भरणे ते कुडोशी व सुकिवली येथील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात होत असून आतापर्यंत ४ दुचाकीस्वार जखमी होऊन त्यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. तसेच खेड रेल्वेस्टेशन ते शिवफाटा आणि भरणे खेड व शहर परिसरातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. गाड्यांचे मोठे नुकसान होत असून जनतेत तीव्र संताप आहे.
या कामाला विलंब झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोठे जनआंदोलन व उपोषणाचा पवित्रा घेण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत तहसिलदार खेड व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूण यांनाही देण्यात आली आहे. यावेळी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष मंगेश भागवत ,उपाध्यक्ष अनंत कांबळे जेष्ठ कार्यकर्ते आनंद भोसले, लक्ष्मण घोलप आदी उपास्थित होते.
खेड तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत राष्ट्रवादीचासार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा…!
