
चिपळूण- दिंडोरीप्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्राच्या माध्यमातून समाज आणि राष्ट्रनिर्मितीचे कार्य केले जाते. समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठीही विविध उपक्रम राबविले जातात. त्यामुळे केवळ आपल्यापुरता हा मार्ग मर्यादित ठेवण्याऐवजी स्वामी सेवामार्ग गावागावात, घराघरात, मनामनात पोहोचवा, असे आवाहन गुरुपुत्र कृषिभूषण श्री. आबासाहेब मोरे यांनी केले. यावेळी उपस्थित सेवेकऱ्यांनी स्वामी नामाचा एकच जयघोष केला.
श्री स्वामी सेवामार्गातर्फे 22 ते 26 जानेवारी 2027 या काळात छत्रपती संभाजीनगर येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या पूर्वनियोजनाचा एक भाग म्हणून गुरुपुत्र श्री. मोरे यांचा नुकताच कोकण दौरा पार पडला. यानिमित्ताने त्यांनी चिपळूण तालुक्यातील पोफळी सेवाकेंद्राला भेट दिली आणि सेवेकऱ्यांशी संवाद साधला. पोफळी सेवाकेंद्रासह चिपळूण तालुक्यातील सेवेकऱ्यांनी गुरुपुत्र श्री. आबासाहेब मोरे यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांचा हितगुजाचा कार्यक्रम पार पडला.
आपल्या मार्गदर्शनात श्री. आबासाहेब मोरे यांनी सेंद्रिय शेतीची कास धरा, असे आवाहन केले. नैसर्गिक शेती कशा पद्धतीने करावी, याबाबत मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारावी, असे आग्रहाने नमूद केले. कमीत कमी खर्चात विवाह करून मोठेपणा, दिखावा यांना थारा देऊ नका, असे मत त्यांनी मांडले. सेवामार्गाचा मूल्यसंस्कार विभाग सक्षम करतानाच प्रत्येक गावामध्ये सेवाकार्याची ज्योत प्रज्वलित करा आणि सेवाकार्य करताना अनावश्यक विचार, अहंकार, स्वार्थ, भेद, मत्सर आणि नकारात्मकता यांना अजिबात थारा देऊ नका तसेच व्यक्तीबद्दल असलेली आसक्ती कमी करा, अशा शब्दांत त्यांनी मार्गदर्शन केले.
