चिपळूण : पायांनी चालता येत नसतानाही जिद्दीने आकाशाला गवसणी घालणाऱ्या नऊ दिव्यांगांची स्वप्ने दिव्यांगमित्र अशोक भुस्कुटे यांनी पुन्हा एकदा साकार केली. रत्नागिरी जिल्ह्यातील ९ तालुक्यांमधून प्रत्येकी एक याप्रमाणे निवडलेल्या दिव्यांगांसाठी यंदा मुंबई-गोवा विमान प्रवासाचे आयोजन करण्यात आले होते.
पोलिओ, पॅराप्लेजिक आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफीमुळे अनेक वर्षे घराच्या उंबरठ्याबाहेरही न पडलेल्या या दिव्यांगांना थेट विमानातून गगन भरारीचा आनंद घेता आला. विशेष म्हणजे ही संपूर्ण सहल पूर्णतः विनामूल्य होती आणि ९ दिव्यांगांसाठी ९ व्हीलचेअरची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
या सहलीमध्ये सूरज चव्हाण (राजापूर), देवेश कुळ्ये (लांजा), मंदार आग्रे (रत्नागिरी), रघुनाथ गोरे (रत्नागिरी), द्रौपदी चोळले, सूर्यकांत चोगले (दापोली), रिया मोरे (खेड), श्रावणी शिंदे (चिपळूण) आणि सुगंधा कोदारे (संगमेश्वर) हे सहभागी झाले होते.
सोमवारी सायंकाळी सर्व दिव्यांग भुस्कुटे यांच्या निवासस्थानी एकत्र जमले. बापू काणे यांच्याकडे जेवण करून मध्यरात्री टेम्पो ट्रॅव्हलरने मुंबईकडे रवाना झाले. मंगळवारी सांताक्रूझ येथे भुस्कुटे यांची कन्या आलिया हुजेर खान आणि जावई हुजेर खान यांच्या घरी त्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
दुपारी २ वाजता सांताक्रूझ विमानतळावर दाखल झाल्यानंतर विमानतळावरील सेवेचा अनुभव घेत सायंकाळी ४.३० वाजता विमानाने आकाशात झेप घेतली आणि या बांधवांनी आकाश भरारीचा अविस्मरणीय आनंद घेतला.
गोवा येथील दाबोलीम विमानतळावर उतरल्यानंतर कालापूर येथील रुग्णाश्रय आश्रमात दिलीप सहकारी यांच्या मदतीने त्यांच्या निवासाची सोय करण्यात आली होती. संस्थेच्या अध्यक्षा चित्रा नाईक यांनी सर्व दिव्यांगांना भेटवस्तू देऊन सन्मानित केले.
बुधवारी मडगावहून जनशताब्दी एक्स्प्रेसने हे सर्व दिव्यांग बांधव रत्नागिरी आणि चिपळूण येथे परतले.ही सहल यशस्वी करण्यासाठी समीर करीम नाकाडे आणि साधना गुढेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
